अ‍ॅड.प्रवीण चव्हाण न्यायालयीन कोठडीतच

जळगाव : मविप्र संस्थेतील दाखल गुन्ह्यातील संशयित तथा जळगावील रहिवासी निलेश भोईटे यांच्या घराची झडती घेण्यापूर्वी घरात रक्ताने भरलेला सुरा पुणे पोलिसांना मिळून येईल, असा कट रचल्याच्या गुन्ह्यात
जळगाव शहर पोलिसांनी तत्कालीन सरकारी वकील अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांना रविवारी दुपारी चाळीसगावातून अटक केली होती. सोमवारी न्यायालयाने अ‍ॅड.चव्हाण यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर मंगळवारी न्या.आर.वाय.खंडारे यांच्या न्यायासनापुढे जामीन अर्जावर सुनावणी झाली. याप्रसंगी पोलिसांनी जामीन देण्याच्या मुद्यावर से देण्यासाठी मुदत मागितल्याने 2 मार्च रोजी आता जामीन अर्जावर कामकाज होणार असल्याने तो पर्यंत अ‍ॅड.चव्हाण यांचा न्यायालयीन कोठडीतच मुक्काम वाढला आहे.

सलग चार दिवस अ‍ॅड.चव्हाण राहणार कोठडीत
चाळीसगावात खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात आलेल्या अ‍ॅड.चव्हाण यांना रविवारी दुपारी जळगावातील शहर पोलिसांनी निलेश भोईटे यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक केली होती. गंभीर गुन्ह्यात अडकवण्याचा संबंधितांनी कट रचल्याप्रकरणी भोईटे यांनी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल केल्याने पोलिसांनी चौकशी केल्यानंतर अ‍ॅड.चव्हाण यांनी रविवारी रात्री अटक केली व सोमवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. अ‍ॅड.चव्हाण यांच्यातर्फे वकीलांनी जामिनासाठी अर्ज केल्यानंतर त्यावर मंगळवारी सुनावणी होणार होती मात्र तपासाधिकारी पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी जामीन अर्जावर से देण्यासाठी मुदत मागितल्याने आता जामिनावर 2 रोजी कामकाज आहे.