Crime News : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. अशातच पुन्हा धुळ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातील मजूर तरुणीवर शेतमालकानेच वेळोवेळी अत्याचार केला. त्यातून ती गरोदर राहिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून शेतमालकावर धुळे तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
पोलीस सूत्रानुसार, शिंदखेडा तालुक्यातील पीडित १९ वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार पीडितेचे आई- वडील हे आनंदा दगा पाटील (रा. चिंचखेडा) याच्या शेतात मजुरी करीत होते. ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२२ दरम्यान संशयित आनंदा पाटील याने पीडितेचे अंघोळ करतानाचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये चोरुन काढले. नंतर ते तिला दाखवून फोटो तिच्या सासरी दाखविण्याची भीती घातली.
तिच्या असहायतेचा गैरफायदा घेऊन तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती चार महिन्यांची गरोदर राहिली. ही बाब पीडितेच्या आई- वडिलांना लक्षात आल्यानंतर ते जाब विचारण्यास गेले. त्यावेळी आनंदा पाटील याने त्यांना जातिवाचक शिवीगाळ करून ठार मारण्याची धमकी दिली. मोबाईलमधील फोटो तिच्या सासरच्यांना दाखवून बदनामी करेल, अशी धमकी दिली. त्यानुसार संशयित आनंदा पाटील याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला.