जळगाव : खदानीत बुडून तीन वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडलीय. रोहित विकास पठाण (३) असे मयत झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. याच खदानीत आई कपडे धुत असताना तिच्या डोळ्यात देखत तिच्या एकुलत्या एक चिमुकल्याचा करून अंत झाल्याने आईने मोठा हंबरडा फोडला होता. एरंडोल तालुक्यातील सावदे येथे सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेबाबत पाळधी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
एरंडोल तालुक्यातील सावदे गावात विकास सुपडू पठाण हे पत्नी मोनी आणि ३ वर्षाचा मुलगा रोहित यांच्यासह राहतात. पठाण हे शेताच्या कामाला निघून गेले होते. गावापासून काही अंतरावर खदान आहे. या खदानीत अनेक महिला कपडे धुण्यासाठी जात असतात. त्याचप्रमाणे आज सोमवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रोहितला सोबत घेऊन त्याची आई गावातील खदानीकडे कपडे धुण्यासाठी गेली होती. या दरम्यान आई कपडे धुण्यात व्यस्त असताना दुसरीकडे खदानीजवळ खेळत असताना पाय घसरल्याने रोहित हा खदानीत पडला. याठिकाणी पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. आईच्या डोळ्यात देखत रोहित बुडाल्याने आईने आरडाओरड केली.
त्यानंतर गावातील काही ग्रामस्थांनी तसेच तरुणांनी रोहितला खदानीतून बाहेर काढले. त्याला तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य साळुंके यांनी त्याला मृत घोषित केले. रोहित हा एकुलता एक होता. तो हा गावातील बालवाडीत शिकत होता. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत घटनेबाबत पाळधी पोलीस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू होते. रोहित हा एकुलता एक मुलगा असल्याने आई वडिलांसह नातेवाईकांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केला होता. एकुलता एक चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.