मुंबई : आई- बाबा मला माफ करा, मी हे खुप विचार करून करत आहे. मला कोणीही मदत करू शकले नाही. खुप काही सांगायचे आहे, पण सांगु शकत नाही. शब्दात व्यक्त करणे अवघड आहे. मी प्रार्थना करते कि जगात कोणीही असे पाऊल उचलु नये, या भावनिक शब्दांची दोन पानी सुसाईड नोट लिहत २३ वर्षीय तरुणीने आपले जीवन संपविले. अवनी भानुशाली (२३) असे मृत तरुणीचे नाव आहे. या तरुणीने रविवार, ७ रोजी दुपारी दोनच्या सुमारास रीश्चंद्रगडाच्या कोकणकड्यावरून उडी मारून आत्महत्या केली. मात्र, आत्महत्या का केली ? हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
मुंबईच्या घाटकोपर येथे अवनी भानुशाली ही तरुणी आपल्या कुटुंबियांसह (२३) वास्तव्यास होती. रविवार, ७ रोजी पाचनई गावातून अवनीने गावातील स्थानिक वाटाड्याला सोबत घेऊन अहमदनगर जिल्ह्यातील हरीश्चंद्रगड सर करायला सुरुवात केली. दुपारी दोनच्या सुमारास गडाच्या कोकणकड्याजळ आली असता, पाठीवरील बॅग बाजूला काढत तिने कड्यावरून अचानक खाली उडी मारली. सोबत असलेल्या गाईड समोरच हे घडले.
त्याने पाचनई गावचे सरपंच भास्कर बादड यांना सदर घडलेली घटना कळवली असता बादड यांनी पोलीस स्टेशनला व रेस्क्यु समनवयक ओंकार ओक यांना माहिती कळवली. ओक यांनी त्वरित लोणावळ्याचे गणेश गिध, नाशिकचे दयानंद कोळी यांना माहिती दिली.
गणेश गिध यांच्या नेतृत्वा खाली सोमवार, ८ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास कोकणकड्यावरून दीपक विषे व तनया कोळी हे दोघे जण रोपच्या सहायाने १४०० फुट खोल दरीत स्ट्रेचर व विक्टिम बॅग घेऊन खाली उतरले. १८०० फुट उंचीचा कोकणकडा रॅपलिंग करणे हे मोठ्या जिकिरीचे काम, उन्हाळ्यात उतरणे तर अजूनच थरारक काम असते.
अनेक संकटाना सामोरे जात दीपक विषे व तनया कोळी हे दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मृतदेहा जवळ येऊन पोहचले. त्यांनी छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह शवबॅगेत भरला. कोकणकड्यावर असलेल्या रेस्क्यु टीमच्या सदस्यांनी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान मृतदेह वरती खेचला व राजूर पोलीसांच्या ताब्यात दिला.
खाली उतरलेले दीपक विषे व तनया कोळी हे खाली बेलपाडा या गावातुन राजुर या गावात पोहचले. राजुर पोलीस स्टेशनच्या वतीने सर्व रेस्क्यु टीम मधील सदस्यांचे पोलीस अधिकाऱ्यांनी आभार मानत कौतुक केले तसेच आर्थिक सहकार्य केले.