आई-वडिलांचे छत्र हरपले, एकाकी जीवन व्यथित करणाऱ्या तरुणानं… घटनेनं खळबळ

जळगाव : आई वडिलांचे छत्र हरपलेल्या आणि एकाकी जीवन व्यथित करणाऱ्या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. बाळासाहेब लोटन पवार (३५) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. शहरातील खोटे नगर परिसरात आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बाळासाहेब हा तरुण एमआयडीसी परिसरात एका कंपनीत कामाला होता. त्याच्या आई-वडिलांचे चार ते पाच वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. तर तीन बहिणींचे लग्न झाले आहे. त्यामुळे हा युवक जळगावातील खोटेनगरात भाड्याच्या घरात एकटाच राहत होता. रविवार, ८ ऑक्टोबर रोजी दुपार झाली तरी तो घराबाहेर दिसून न आल्याने घरमालक यांना संशय आल्याने त्यांनी डोकावून पाहिले असता बाळासाहेब हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी तालुका पोलिस स्टेशनला माहिती दिल्यावरून घटनास्थळी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.

दरम्यान, या युवकाने शनिवारी रात्रीच गळफास घेतला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे. बाळासाहेब पवार याला तीन बहिणी सडून त्या सुरत, पुणे व धुळे जिल्ह्यातील नंदाडे येथे राहतात. अगोदरच आई-वडिलांचे निधन झालेले व त्यात एकुलत्या एक भावानेही जीवन संपविल्याने बहिणींवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.