आगामी दोन दिवस पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाची माहिती

तरुण भारत लाईव्ह । २७ सप्टेंबर २०२३। गेल्या काही दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पुढचे दोन दिवस जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुणे शहर परिसरात मध्यम स्वरुपाचा, तर घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

पावसाने एक दिवस विश्रांती घेतल्यावर मंगळवारी मुसळधार पाऊस झाला आणि नागरिकांची तारांबळ उडाली. धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले होते. ढगाळ वातावरणाची स्थिती कायम असून, अधूनमधून उन्हाचे सावटही पाहायला मिळत आहे. मॉन्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असताना मात्र राज्यात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम शहरावरही होऊ लागला आहे.

मंगळवारी मुसळधार पावसामुळे शहरात ३५.८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली. यंदाच्या सप्टेंबर महिन्यातील आजचा सर्वाधिक पाऊस होता. याआधी शनिवारी  शहरात २५.६ मिलिमीटर इतका पाऊस झाला होता.