जळगाव । राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या शिव स्वराज्य यात्रेच्या कार्यक्रमात भाजप वाटेवर असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी हजेरी लावल्याने त्यांचा भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला अखेर ब्रेक लागला. या कार्यक्रमात त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर देखील टीका केली.
गणपती विसर्जनानंतर माझा प्रवेश होईल असे देवेंद्र जी म्हटले होते मात्र माझ्या दृष्टीने आता भाजप प्रवेश हा गणपती बाप्पा बरोबर विसर्जित झाला असल्याचं खडसे म्हणाले. मी आता राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्थायी आहे. सदस्य आहे आणि यापुढेही ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय काम करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार करणार असल्याचं खडसे म्हणाले. त्यामुळे नाथाभाऊच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला ब्रेक लागला आहे.
यावेळी एकनाथ खडसे यांनी मंत्री महाजन यांच्यावर टीका केली. मी सभा घेतली त्यामुळे त्यावेळेस गिरीश महाजन निवडून आले होते. आता गिरीश महाजन यांना आणून मी पाप केलं असं मला वाटतं. ज्याला मोठे केले, ते सद्गृहस्थ वाटले होते, त्याची अलीकडची वर्तणूक पाहिली की पाप केले असे वाटते असे खडसे म्हणाले.