पुणे : आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यासाठी इंडीया आघाडीच्या नावाखाली विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. यातच इंडीया आघाडीतील पक्षांमध्ये जागा वाटपावरुन मतभेद असल्याच्या चर्चा रंगल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, “निवडणुका येतील तेव्हा काही जागांबाबत मतभेद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे प्रश्न येतात, तेव्हा त्या राज्यात ज्यांचा रस नाही, अशांना तिथे पाठवून त्या मतभेदांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करू, असे ते म्हणाले.
तसेच मध्य प्रदेश, राजस्थान यासह चार राज्यांतील निवडणुका सध्या महत्त्वाच्या आहेत. तिथे एकवाक्यता करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. अद्याप ती प्रक्रिया आम्ही सुरू केलेली नाही. मी मुंबईत परतल्यानंतर काँग्रेस व इतर पक्षीय नेत्यांशी चर्चा करून यावर वाद होऊ नये याची काळजी घेऊ. हे येत्या ८-१० दिवसांत होईल असा अंदाज आहे,” असेही शरद पवार म्हणाले. ते बारामती येथे माध्यमांशी बोलत होते.