Maharashtra Politics : सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सोपवला आहे. त्यानुसारआमदारांच्या अपात्रतेचा तिढा सोडवण्यासाठी नार्वेकर यांनी आजपासून कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. काल बैठका घेतल्यानंतर नार्वेकर हे आज ठाकरे आणि शिंदे गटातील 54 आमदारांना नोटिसा पाठवणार आहेत. या 54 आमदारांना सात दिवसांच्या आत आपलं म्हणणं मांडण्यास सांगण्यात येणार आहे. या आमदारांचं म्हणणं ऐकूनच नार्वेकर आपला निर्णय देणार आहेत. त्यामुळे नार्वेकर यांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आजपासून कार्यवाहीला सुरुवात केली आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्ष आज दोन्ही गटाकडून राजकीय पक्षाची घटना मागवणार आहेत. राजकीय पक्ष कोण हे तपासण्यासाठी पक्षाच्या घटनेचा अभ्यास करण्यात येणार आहे. त्याच प्रमाणे ठाकरे आणि शिंदे गटातील 54 आमदारांना आजच नोटिसा बजावण्यात येणार आहेत. पुढील सात दिवसात भूमिका मांडण्यासाठी आमदारांना वेळ देण्यात येणार आहेत. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.