जळगाव । डिसेंबर 2023 मध्ये सोने आणि चांदी दरात नवीन उच्चांक गाठला होता. यामुळे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घाम फुटला होता. किंमती सर्वकालीन उच्चांकावर पोहचल्यानंतर सोने-चांदी मोठा पल्ला गाठणार असे वाटत होते. पण जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दोन्ही धातूंना हा पल्ला पण गाठता आलेला नाही. सलग दोन आठवड्यात घसरण झाल्याने ६३ हजार रुपयांवर असलेला सोन्याचा दर ६२ हजार रुपयाच्या घरात आला होता. तर चांदीचा दरही ७१ हजार रुपयाच्या खाली आला होता. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला होता.
मात्र आता दोन्ही धातूंच्या दरात वाढ आली. खरंतर गेल्या बुधवारी ७०,५०० रुपये असलेल्या चांदीचे दर चार दिवस ७२ हजारांच्या खाली होते. आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी ७२ हजारांचा टप्पा पार करत ७२५०० झाले. तर मंगळवारी पुन्हा ५०० रुपयाची वाढ होऊन ते ७३ हजारांवर गेले. आठवड्याभरात चांदी तब्बल २५०० रुपयांनी वधारली आहे.
दुसरीकडे सोनंही महागले आहे. जळगाव सराफ बाजारात गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सोन्याचा प्रति तोळ्याचा भाव ६२,२०० (विनाजीएसटी) रुपयांवर होता. मात्र या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी सोने ६२,४०० रुपयांवर आले तर मंगळवारी १०० रुपयाची वाढ होऊन ते ६२,५०० तर आता २०० रुपयाची वाढ झाली असून सोन्याचा दर ६२,७०० रुपयावर जाऊन पोहोचला आहे.