आठवण शाळेची… उत्सव मैत्रीचा… तब्बल १८ वर्षांनी आले माजी विद्यार्थी एकत्र

धरणगाव : साळवे येथील ग्रामसुधारणा मंडळ, साळवे संचलित साळवे विद्यालयात सन 2006 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच पार पडला. अध्यक्षस्थानी मंडळाचे चेअरमन डॉ. गिरीश नारखेडे, संचालक मंडळ, मुख्याध्यापक ए.एस पाटील हे होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आपल्या गुरुजनांना गुलाब पुष्प, ट्रॉफी, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. माजी विद्यार्थी, विद्यार्थीनींनी शाळा व शिक्षकांविषयीचा आदर, भावना व्यक्त केल्या.

आपले बालपणीचे अनुभव, शाळेच्या परिसरातील जुन्या आठवणी पुन्हा समोर आल्याचा भास सर्वांना होऊ लागला असल्याचे मत माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. यावेळी  अनेक मनोरंजनात्मक खेळ खेळण्यात आले. त्यांना पाहून शिक्षकांनाही खेळायचा मोह आवरला गेला नाही, तेही विद्यार्थ्यांमध्ये खेळात सामील झाले.

स्नेहभोजन मध्ये शेवभाजी, भरीत, कळण्याची भाकरी, पनीरभाजी, पुलाव, काजुकतली इ.असा खुसखुशीत व लज्जतदार मेनू होता. कार्यक्रमाचा निरोप घेतांना विद्यार्थ्यांनी चेअरमन, संचालक मंडळ, मुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी वेळ दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी आशिर्वाद व शुभेच्छा दिल्या व सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती राणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी माजी विद्यार्थी मयूर चोपडा, आसिफ पठाण यांनी पुढाकार घेतला. सर्व विद्यार्थी मित्रांनी सहकार्य केले.