आढळले बेवारस नवजात बालक, शहरात खळबळ; बालकाची प्रकृती स्थिर

जळगाव : भुसावळ शहातील रेल्वे लाईन नजीक रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास बेवारस अवस्थेत एक नवजात बालक आढळले. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. लोहमार्ग पोलिसांनी नवजात बालकाला ताब्यात घेत ड्रामा केअर सेंटरमध्ये दाखल केले. बालकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. दरम्यान, नवजात बालकाला बेवारस अवस्थेत सोडणाऱ्या पालकांचा लोहमार्ग पोलिसांकडून शोध सुरू आहे.

भुसावळ रेल्वे लोखंडी पुलावरील डाऊन रेल्वे लाईनजवळ सुमारे अडीच महिने वयाचे पुरूष जातीचे बाळ रविवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाला आढळले. रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी सुबहसिंग पृथ्वीराजसिंग मीना हे रविवारी पहाटे कर्तव्यावर असताना त्यांना डाऊन रेल्वे लाईनवरील खांबा क्रमांक 161 नजीक झुडूपात कापडात गुंडाळलेले पुरूष जातीचे बाळ रडत असल्याचे दिसताच त्यांनी रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक आर.के.मीना यांना माहिती कळवली.

रडत असलेल्या बाळास तातडीने भुसावळातील ट्रामा केअर सेंटरमध्ये हलवण्यात आल्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आहे. साधारण अडीच महिने वयाचे हे बाळ असून ते कुणी व केव्हा सोडले ? याबाबत माहिती कळू शकली नाही. आरक्षक सुबहसिंग मीना यांच्या फिर्यादीवरून अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल झाला.