…आणि विरोधक म्हणतात, मोदींचं मणिपूरकडं लक्ष नाही; अमित शहांनी खोडून काढले आरोप

नवी दिल्ली : मणिपूरच्या हिंसाचारवर आज दिवसभर लोकसभेत चर्चा झाली. राहुल गांधींनी मोदी सरकारला पूर्णपणे घेरण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी त्यावर उत्तर दिली. गृहमंत्री अमित शहा यांनी देखील निवेदन केलं. यावेळी त्यांनी मणिपूर प्रकरणावरुन पंतप्रधान मोदींवर होणारे आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला. मोदी मणिपूरवर का बोलत नाहीत? या आरोपावरही त्यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलं.

काय म्हणाले शहा?
शहा म्हणाले, “हा परिस्थितीजन्य वांशिक हिंसाचार आहे. याला राजकीय मुद्दा बनवू नका. मणिपूरची स्थिती जाणून घेण्यासाठी या देशाच्या पंतप्रधानांनी मला पहाटे चार वाजता फोन केला आहे. तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी साडे सहा वाजता मला याचं पंतप्रधानांनी झोपेतून उठवलं देखील आहे. आणि विरोधक म्हणतात की मोदीचं मणिपूरकडं लक्ष नाही”

सलग तीन दिवस आम्ही दिल्लीतून मणिपूरची परिस्थिती नियंत्रणात आणण्याचं काम केलं. १६ व्हिडिओ कॉन्फरन्स केल्या. ३६ हजार सीआरपीएफचे जवान तिथं पाठवले. हवाई दलाच्या विमानांचा वापर केला. मुख्य सचिव बदलला, पोलीस महासंचालक बदलला, सूरतहून अॅडव्हाझर पाठवण्यात आला.

ज्या लोकांना हटवलं त्यांच्या जागी नव्या लोकांना भारत सरकारनं पाठवलं. हे सर्व ४ मेच्या संध्याकाळपर्यंत संपलं होतं. ३ मेला हिंसाचार झाला आणि ४ तारखेला हा हिंसाचार संपला होता. आणि हे विचारतात की ३५६ कलम का लागू केलं नाही.

३५६ तेव्हा लावलं जातं जेव्हा हिंसाचारावेळी राज्य सरकार सहकार्य करत नाही. पण मणिपूरमधल्या बिरेन सिंह सरकारनं केंद्रानं पाठवलेले अधिकारी स्विकारले. त्यामुळं मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा प्रश्नच येत नाही. कारण मुख्यमंत्री तेव्हाच बदलला जातो जेव्हा ते सहकार्य करणार नाही. पण तिथले मुख्यमंत्री तर सहकार्य करत आहेत.