रावेर : भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे माजी मंत्री आ. एकनाथराव खडसे यांनी जाहीर केले होते. परंतु, प्रवेशाची तारीख निच्छित न झाल्याने ते अद्यापपर्यंत सुनेच्या प्रचारात सक्रिय झाले नव्हते. आता वरिष्ठांच्या आदेशानुसार ते महायुतीच्या उमेदवार (सून) खासदार रक्षा खडसे यांच्या प्रचारास सक्रिय झाल्याचे खुद्द त्यांनीच प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
आमदर एकनाथराव खडसे यांनी ३० एप्रिल रोजी यावल येथील भाजप प्रचार कार्यालयास भेट देत कार्यकर्त्यांना सूचना देत आढावा घेतला. यावेळी “वरिष्ठांकडे माझ्या भाजप प्रवेशाबाबत मी सूचित केले होते. त्यानुसार भाजपाचे वरिष्ठ नेते विनोद तावडे तसेच भाजपाचे प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना माझा प्रवेश कधी जाहीर करणार असे त्यांना विचारले असता त्यांनी प्रवेशाची तारीख कळवणार असल्याचे सांगून तुमचा प्रवेश झालेलाच आहे. बैठका घेण्यास व प्रवास करण्यास हरकत नसल्याचे सांगितले. त्यानुसार मी गेल्या दोन दिवसापासून प्रचारात सक्रिय झालो असून यावल हे माझे प्रचारार्थ आठवे गाव असल्याचे त्यांनी सांगितले.
आगामी निवडणुकीत रावेर लोकसभा निवडणूक मतदार संघ अंतर्गत भाजपा उमेदवारास किती लीड मिळेल. यापेक्षा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. मतदारांचे मतदानाचे प्रमाण यावर लीड अवलंबून असेल तरीही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वरील विश्वास व कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता रक्षा खडसे प्रचंड बहुमताने निवडून येतील असं त्यांनी सांगितले.