“आता इथून पुढे फक्त माझं ऐका”, अजित पवारांची कार्यकर्त्यांना सुचना

पुणे : आता इथून पुढे फक्त माझं ऐका बाकी कुणाचंही ऐकू नका, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. रविवारी बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, “केवळ विकासासाठी आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. आता इथून पुढे फक्त माझं ऐका बाकी कुणाचंही ऐकू नका. बाकीच्यांचं खूप वर्ष ऐकलं आता फक्त माझं ऐका. काम करण्याचाही प्रत्येकाचा काळ असतो. आम्ही आतापर्यंत वरिष्ठांनी सागितलं ते काम करत आलोय.”
“आता इथून पुढे थोडी कठोर भुमिका घ्यावी लागेल. इकडे पण तिकडे पण असं चालणार नाही. ज्याला माझ्याबरोबर रहायचं आहे त्यांनी राहावं. ज्यांना इतर ठिकाणी जायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे. मी सगळी कामं करेन. सगळी कामं माझ्याकडूनच होणार दुसरं कोणीही करु शकत नाही. कारण आज आम्ही सरकारमध्ये आहोत. याआधी मी सतत मागे असायचो. वडिलधाऱ्यांनी सगळं बघावं असं होतं. परंतू, यानिमित्ताने मोठ्या नेत्यांशी तरी संबंध येऊ लागला आहे,” असेही ते म्हणाले.
तसेच “मी तर ६० वर्ष पार झाल्यावर वेगळी राजकीय भुमिका घेतली आहे. काहींनी तर ३८ व्या वर्षीच घेतली होती. तेव्हा आपण पाठिंबा दिलाच,” असा टोलाही त्यांनी नाव न घेता शरद पवारांना लगावला. “वसंतदादा देखील चांगलं नेतृत्व होतं, त्यांना देखील बाजूला केलं गेलं. माझ्यासोबत आज ५३ पैकी ४३ आमदार येतात. दोन अपक्ष आमदार आणि नऊ विधानपरिषद आमदारापैकी सहा आमदार माझ्याबरोबर येतात. याचा अर्थ मी घेतलेला निर्णय योग्य आहे म्हणूनत बहुमताने ते माझ्याबरोबर आले,” असेही ते म्हणाले आहेत.