आता खासदार डॉ. हिना गावितांकडून कॉर्नर सभांचा धडाका; केले काँग्रेसवर प्रहार

नंदुरबार : गाव पातळीवरचे मेळावे घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद करण्याची पूर्ण मतदार संघातील फेरी संपताच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार खासदार डॉ. हिना गावित यांनी आता कॉर्नर सभा घेण्याचा धडाका सुरू केला. काल 18 रोजी सायंकाळी त्यांनी शहादा विधानसभा क्षेत्रातील म्हसावद, राणीपूर आणि नवागाव या ठिकाणी कॉर्नर सभा घेतल्या.

शहादा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सभापती हेमलता शितोळे, ज्येष्ठ कार्यकर्ते डॉक्टर कांतीलाल टाटिया यांच्यासह स्थानिक मान्यवर कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हसावद, राणीपूर आणि नवागाव या ठिकाणी पार पडलेल्या कॉर्नर सभांमधून खासदार डॉ. हिना गावित यांनी काँग्रेसकडून केल्या जाणाऱ्या अपप्रचाराचे जोरदार खंडन केले व मोदी सरकार आणि गावित परिवारा विरोधात केल्या जाणाऱ्या आरोपांचाही समाचार घेतला. स्वातंत्र्यप्राप्तीपासून आतापर्यंत कोणीही देऊ शकले नाही इतके घरकुल आपण मागील दहा वर्षात नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील बेघरांना मिळवून दिले आहे. काँग्रेस नेते आतापर्यंत प्रत्येक योजना केवळ आप्तस्वकीयांसाठी राबवत आले.

आदिवासींचा जीवन आधार असलेले जंगल काँग्रेस नेत्यांनी साफ केले. त्या उलट आम्ही मागील दहा वर्षात आदिवासी घटकांना खरा न्याय मिळवून दिला. जीवनमान बदलवून देणाऱ्या योजना आदिवासींसाठी दिल्या. गावातील महिलांना सुध्दा लाभ मिळवून दिले. आत्मनिर्भर बनाव्या यासाठी 1300 बचत गटातील महिलांना प्रत्येकी दहा हजाराचे सहाय्य दिले. 2 लाख 43 हजार महिलांना मोफत गॅस कनेक्शन दिले. मोदी सरकारने सर्वाधिक योजना महिलांसाठी राबवल्या. इतके वर्ष सत्ता भोगणाऱ्या काँग्रेस कडून आदिवासींना आणि महिलांना हा सन्मान व अधिकार कधी मिळाला नाही; अशा शब्दात खा. डॉ. हिना गावित यांनी प्रहार केला.