आता जळगावकरांचा मुंबई प्रवास ‘सुपरफास्ट’ होणार ; लवकरच विमानसेवेला प्रारंभ

जळगाव । जळगावकरांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे जळगाव विमानतळावरून लवकरच जळगाव-मुंबईसाठी विमानसेवेला प्रारंभ होणार आहे. भारत सरकारच्या ‘अलायन्स’ या विमान सेवा कंपनीकडून ही सेवा पुरविली जाणार असून अंतिम मंजूरीची प्रक्रिया सुरू असल्याने जून महिन्यात या सेवेला सुरूवात होण्याची शक्यता आहे.

देशासह महाराष्ट्राची राजधानी मुंबई ते खानदेश नगरी जळगाव यादरम्यान दररोज हजारोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करत असतात. जळगाव शहरातून शिक्षण, पर्यटन, नोकरी, व्यवसाय अशा विविध कामांसाठी राजधानीत येत असतात. मात्र, सध्या जळगाव नगरीतून मुंबईत जाण्यासाठी ट्रॅव्हल्स किंवा रेल्वेचाचं पर्याय उपलब्ध आहे.

रेल्वेने प्रवास करायचा झाला तर सुमारे आठ तासांचा प्रवास करावा लागतो आणि ट्रॅव्हल्स प्रवास करायचा झाला तर दहा तासाहून अधिकचा वेळ खर्च करावा लागतोय.मात्र आता लवकरच जळगाव-मुंबई आणि मुबई-जळगाव विमानसेवा सुरु होणार आहे. त्यामुळे आता अर्धा ते एक तासात जळगावहुन मुंबई गाठता येणार आहे.

भारत सरकारच्या अलायन्स या एअरलाइन्स कंपनीकडून ही सेवा पुरवली जाणार आहे. मुंबई ते जळगाव दरम्यान विमानसेवा सुरू करण्यास एअरलाइन्स कंपनीला नुकतीच प्राथमिक स्वरूपाची परवानगी मिळाली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाने ही विमान सेवा सुरू करण्यास नुकताच हिरवा कंदील दाखवला असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. मात्र अजून या विमानसेवेला सरकारकडून अंतिम मंजुरी मिळालेली नाहीये.

पण, लवकरच या विमान सेवेला अंतिम मंजुरी मिळेल आणि या मार्गावर जून महिन्यातच विमान सेवा सुरू होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. निश्चितच मुंबई ते जळगाव दरम्यान दैनंदिन कामानिमित्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या विमान सेवेचा मोठा फायदा होणार आहे.