माफिया डॉन मुख्तार अन्सारीच्या मृत्यूनंतर बांदा जेलचे अधीक्षक वीरेश राज शर्मा यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मुख्तारच्या मृत्यूनंतर काही तासांतच ही धमकी देण्यात आली होती. २९ मार्च रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास कारागृह अधीक्षक वीरेश राज शर्मा यांच्या सीयूजी क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने फोन करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मात्र, त्यावेळची परिस्थिती लक्षात घेता वीरेश राज शर्मा यांनी याबाबत तक्रार केली नाही. आज, सोमवारी त्यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. कारागृह अधीक्षक वीरेश राज शर्मा यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.