आता पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळू नयेत टीम इंडिया… उद्धव ठाकरेंच्या पक्षाची का आहे मागणी ?

शिवसेना ‘उबाठा’ने जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी घटनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून टी-२० विश्वचषकात पाकिस्तानसोबत न खेळण्याचे आवाहन भारताला केले आहे.

शिवसेना ‘उबाठा’चे नेते आनंद दुबे म्हणाले की, आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, क्रीडा मंत्री मनसुख मांडविया, बीसीसीआय अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. भारताने पाकिस्तानसोबत क्रिकेट सामने खेळू नयेत, असे ते म्हणाले. एकीकडे पाकिस्तान आपल्या लोकांना मारत आहे, तर दुसरीकडे आपण त्याच्याशी क्रिकेट खेळणे योग्य नाही. जोपर्यंत पाकिस्तान गुडघे टेकत नाही तोपर्यंत त्यांच्याशी असलेले सर्व संबंध तोडले पाहिजेत, असं दुबे म्हणाले.

आनंद दुबे यांनी आपल्या पत्रात काय म्हटलंय ?
आनंद दुबे यांनी पत्रात लिहिले आहे की, ‘आज मी तुम्हाला अत्यंत दुःखी अंतःकरणाने लिहित आहे कारण नुकत्याच झालेल्या रियासी, डोडा आणि आता जम्मू-काश्मीर राज्यातील कठुआ येथे घडलेल्या दु:खद घटनांनी आपल्या देशाला हादरवून सोडले आहे ज्यामध्ये निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला. आपली गुप्तचर यंत्रणा भक्कम असूनही अशी घृणास्पद कृत्ये घडत आहेत हे खेदजनक आहे. अशा नापाक कारवायांमध्ये पाकिस्तानचा सातत्याने सहभाग हा गंभीर चिंतेचा विषय आहे.

ते म्हणाले, ‘या गंभीर परिस्थितीत आम्ही देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारसोबत आहोत. या घटना लक्षात घेऊन, या हिंसाचाराचा निषेध म्हणून मी तुम्हाला विश्वचषक क्रिकेट T-20 मधील आगामी भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची विनंती करतो. आमचा विश्वास आहे की आमच्या लोकांची सुरक्षा ही कोणत्याही क्रीडा स्पर्धांपेक्षा महत्त्वाची आहे. या प्रकरणाची आपण कठोरपणे दखल घ्याल अशी आशा आहे.

दहशतवाद्यांनी केले सलग तीन हल्ले 

वास्तविक, गेल्या रविवारी जम्मू-काश्मीरमधील रियासी येथील शिव खोडी येथून परतणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहशतवाद्यांनी अनेक राऊंड गोळीबार केला, ज्यापैकी एक राऊंड बस चालकाला लागला आणि बस 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 9 यात्रेकरूंचा मृत्यू झाला असून 40 जण जखमी झाले आहेत. यानंतर कठुआमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर हल्ला केला, ज्यात एक CRPF जवान शहीद झाला. मात्र, सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. त्याचवेळी मंगळवारी रात्री दहशतवाद्यांनी डोडा येथील पोलीस चौकीवर हल्ला केला. त्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, ज्यात 6 जवान जखमी झाले.