मुंबई : देशातील भ्रष्टाचार उघड करण्यासाठी ठिकठिकाणी ईडीचे धाडसत्र सुरुच आहे. यातच आता पश्चिम बंगालमध्ये गुरुवारी ईडीने १३ ठिकाणी छापे टाकले आहेत. कथित नगरपालिका भरती घोटाळ्याप्रकरणी ही छापेमारी करण्यात आली आहे. यावेळी टीएमसीचे नेते रथीन घोष यांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली आहे.
दरम्यान, ईडीने उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील टीटागड नगरपालिकेचे माजी अध्यक्ष प्रशांत चौधरी यांच्या घरावर छापा टाकला आहे. टीटागड नगरपालिकेतील नोकरभरतीतील कथित भ्रष्टाचाराप्रकरणी हा छापा टाकण्यात आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, कथित नगरपालिका भरती घोटाळ्याप्रकरणी पश्चिम बंगालचे अन्न आणि पुरवठा मंत्री तसेच टीएमसीचे नेते रथीन घोष यांच्या निवासस्थानावर ईडीने छापेमारी केली आहे.
यासोबतच उत्तर २४ परगणा जिल्हा आणि कलकत्ता यासह राज्यात १२ हून अधिक ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली आहे. २०१४ ते २०१८ दरम्यान राज्यातील विविध नागरी संस्थांनी सुमारे १५०० लोकांची बेकायदेशीरपणे भरती केली असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
बुधवार ५ ऑक्टोबर रोजी ईडीने दिल्ली दारू धोरण घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना अटक केली आहे. त्यानंतर आता रथीन घोष यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. त्यामुळे तृणमुल काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.