मुंबई । राज्य सरकार चौथे महिला धोरण राबवत असून आता मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे आईचे नाव लिहावे लागणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. बारामती येथे ग्रामपंचायत सरपंचांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
यादरम्यान, यावेळी त्यांनी काका शरद पवारांवर अप्रत्यक्षपणे टोला लगावला. बरीच वर्षे त्यांचे ऐकले आता माझे ऐका, असे अजित पवार म्हणाले.इथून पुढे माझं ऐका. कुणाचेही ऐकू नका. मी वयाच्या ६० व्या वर्षी वेगळा निर्णय घेतला. त्यांनी तर ३८ व्या वर्षीच घेतला होता अशा शब्दांत अजितदादांनी नाव न घेता होम मैदानातून थेट काकांना लक्ष्य केलं. यावेळी, आपण सत्ताधारी भाजपासोबत का गेलो हे सांगताना अजित पवारांनी राज्य सरकारच्या कामांचाही उल्लेख केला. तसेच, लवकरच राज्यात चौथे महिला धोरणा आणले जाणार असून महिलांचा मोठा सन्मान केला जाईल, असेही अजित पवार म्हणाले.
”महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या नेतृत्वाखाली चौथे महिला धोरण आणले आहे, ज्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली. फार बारकाईने हे धोरण आणले गेले आहे. याआधी मुल जन्माला आल्यानंतर त्याच्या नावापुढे वडिलांचे नाव लावले जायचे. मुलाचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जायचे. आता आपण नवीन निर्णय घेतला आहे. इथून पुढे मुलाचे किंवा मुलीचे नाव, मग आईचे नाव, त्यानंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावले जाईल.”, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.
दरम्यान, अनेकजण आपल्या नावानंतर आईचे नाव, मग वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव लावताना पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही अशी अनेक नावे आहेत. तर, मंत्रीपदाची किंवा आमदारकीची शपथ घेताना, काही नवीन युवा आमदारांनीही आधी आईचे नाव घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे, महिलांचा, आईचा अशाप्रकारे सन्मान केला जात असल्याची बाब उल्लेखनीय आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. स्वत: उपमुख्यमंत्र्यांनी ही धोरणात्मक बाब जाहीर केली.