आता ‘या’ देशातही मिळणार दिवाळी सुटी

नवी दिल्ली : अमेरिकेमध्ये दिवाळीनिमित्त सुटी घोषित करण्यात यावी, असे विधेयक अमेरिकी खासदार ग्रेस मेंग यांनी शुक्रवारी अमेरिकन संसदेत मांडले आहे. या पावलाचे अमेरिकेतील भारतीयांसह विविध समुदायांनी स्वागत केले आहे.

अमेरिकी खासदार मेंग यांनी त्याविषयी शनिवारी ट्विट करून माहिती दिली. त्या म्हणाल्या की, जगभरातील लाखो लोकांसाठी आणि क्वीन्स, न्यूयॉर्क आणि युनायटेड स्टेट्समधील असंख्य कुटुंबांसाठी आणि समुदायांसाठी दिवाळी हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. दिवाळीची सुटी कुटुंबांना आणि मित्रांना एकत्रितपणे सण साजरा करण्याची संधी देईल आणि हे देखील दाखवून देईल की सरकार राष्ट्राच्या विविध सांस्कृतिक सणांना महत्त्व देते. त्याचप्रमाणे अमेरिकेचे सामर्थ्य हे विविध अनुभव, संस्कृती आणि समुदायांमधून येते, हे याद्वारे सिद्ध होणार आहे, असेही खासदार मेंग यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुढील महिन्यात चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकी संसदेनेया विधेयकास मंजुरी दिल्यास अमेरिका – भारत संबंधांमध्ये अधिक माधुर्य येणार आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेतील काही हिंदूविरोधी गटांनाही यामुळे चाप बसणार आहे. अमेरिकेमध्ये गेल्या काही काळापासून जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी विविध विद्यापीठांमधून नियोजनपूर्वक मोहिमा राबविल्या जात असल्याचे दिसून आले आहे. याद्वारे भारत – अमेरिका संबंधांमध्ये कटुता आणण्याचे प्रयत्नही केले जात आहेत. त्यामुळे दिवाळी सुटीद्वारे या सर्व प्रयत्नांना चोख प्रत्युत्तर मिळणार आहे.

अमेरिका दौरा ठरणार महत्त्वाचा
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या भेटीदरम्यान अत्याधुनिक संरक्षण आव्हानांच्या संदर्भात या चर्चेत विशेष लक्ष असेल. याच्या तयारीसाठी गुरुवारी नवी दिल्ली येथे दोन्ही देशांमधील पहिला ‘एडव्हान्स डोमेन डिफेन्स डायलॉग’ आयोजित करण्यात आला होता.