धुळे : आतेभावाशी बहिणीच्या असलेल्या प्रेमसंबंधास विरोध केल्याने सख्ख्या भावाला त्याच्या आईसह बहीण आणि आतेभावाने संगनमताने घातक हत्याराने मारहाण केली. यात अरुण नागेश बाविस्कर ( ३०, रा. बुरझड, ता. धुळे) याचा मृत्यू झाला. याप्रकरणी आतेभावासह अन्य तिघांविरुद्ध सोनगीर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली आहे.
धुळे तालुक्यातील बुरझड येथे ही घटना घटना घडली. मावस भाऊ संदीप धोंडू बाविस्कर (२९) याने फिर्याद दाखल केली. अरुण नागेश बाविस्कर (३०) याची बहीण सुरेखा नागेश बाविस्कर (सुरेखा लाला पवार) (२६) हिचे आणि आतेभाऊ मनोहर लोटन वसईकर (२९, रा. सुरत) याच्याशी प्रेमसंबंध होते.
प्रेमसंबंधास अरुण बाविस्कर याचा विरोध होता. त्यामुळे आतेभाऊ मनोहर वसईकर, बहीण सुरेखा बाविस्कर आणि आई सुमनबाई नागेश बाविस्कर (५२, रा. बुरझड, ता. जि. धुळे) या तिघांनी संगनमताने जिवे मारण्याच्या उद्देशाने काहीतरी हत्याराने अरुण यास मारहाण केली. कशाच्या सहाय्याने तरी गळफास देऊन जिवे मारले. ही घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली.
याप्रकरणी सोनगीर पोलिसात आतेभाऊ मनोहर वसईकर, बहीण सुरेखा बाविस्कर आणि आई सुमनबाई नागेश बाविस्कर या तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा रविवारी दुपारी दाखल करण्यात आला.
घटनेचा तपास उपनिरीक्षक अभय मोरे करीत आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल होताच संशयित आतेभाऊ मनोहर वसईकरला अटक केली आहे.