मुंबई : राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी एक लाख रुपयाची मदत निधीअभावी बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने दोन दिवसांपूर्वी घेतला, मात्र त्यावर टीका होऊ लागल्यानंतर गुरुवार, 5 रोजी हा निर्णय मागे घेण्यात आला. यामुळे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळाला असून, आता शेतकऱ्यांच्या वारसांना पूर्वीप्रमाणंच निधी मिळणार आहे.
सुधारित परिपत्रकानुसार आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना २०२४-२५ या आर्थिक वर्षात उपलब्ध अनुदानातून आर्थिक मदत देण्याची कार्यवाही जिल्हाधिकाऱ्यांनी करावी, त्यासाठी पुरेसा निधी विभागीय आयुक्तांकडे सुपूर्द करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे इतर योजनांसाठी राज्य सरकारच्या तिजोरीत पैसे नसल्याची चर्चा हे परिपत्रक आल्यानंतर राजकीय वर्तुळात होऊ लागली होती. लाडकी बहीण योजनेमुळे अन्य योजना बंद होणार नाहीत, असे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील म्हणाले.
तर, असे परिपत्रक काढण्याचा सल्ला कोण देते ? शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारे निर्णय सरकार घेत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली.