आदित्य ठाकरेंनी सांगितलं दिशा सालियनच्या मृत्यूच्या दिवशी ‘ते’ कुठे होते?

मुंबई : दिशा सालियनच्या आत्महत्या प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांनी आपले मौन सोडले आहे. दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा आपण रुग्णालयात होतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आजोबांवर (रश्मी ठाकरे यांचे वडील) रुग्णालयात उपचार सुरू होते, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. त्यामुळे कितीही आरोप केले तरी सत्य बाहेर येईल असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

दिशा सालियान प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्याकडून सातत्याने आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. दिशाने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाल्याचा आरोप राणे यांच्याकडून करण्यात आला होता. दिशावर अत्याचार करण्यात आला. त्यानंतर तीने या प्रकरणाची वाच्यता करू नये यासाठी तिची हत्या केली आणि त्याला आत्महत्येचे स्वरुप देण्यात आले असल्याचा आरोप राणे यांनी केला होता. तर, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ४४ वेळा फोन केलेली एयु नावाची व्यक्ती कोण याची चौकशी करण्याची मागणी केली होती.

यावर प्रथमच मौन सोडत दिशा सालियानचा मृत्यू झाला तेव्हा आपण रुग्णालयात होतो, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. सत्ताधार्‍यांकडून होणार्‍या सततच्या आरोपांमुळे प्रतिमेला डाग लागले जात आहेत असं विचारलं गेलं असता आदित्य ठाकरेंनी मिंधे सरकारचं मांजर झाल्याचं म्हटलं. डाग वगैरे काही नाही. आम्ही पट्टेरी वाघ आहोत आणि मिंधे सरकारचे पट्टे पुसले गेले असून त्यांची मांजर झाली आहे. एका ३२ वर्षांच्या तरुण आमदाराला मिंधे सरकार घाबरलं आहे. मुख्यमंत्र्यांवरील आरोप गंभीर असून त्यांचा राजीनामा घेईपर्यंत लढत राहणार असा निर्धार आम्ही केला आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.