आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार; राज्य महिला आयोगाने कार्यवाहीच्या सूचना द्याव्यात !

नंदुरबार : पिंपळनेर येथे आदिवासी महिलेवर झालेल्या सामुहिक अत्याचारप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने पोलिस यंत्रणा व प्रशासनाला कार्यवाही करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे राज्याध्यक्ष अर्जुनसिंग दिवाणसिंग वसावे यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे निवेदनाद्वारे केली.

धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पिंपळनेर येथे नवापूरला येण्यासाठी आदिवासी महिला व तिचा मुलगा बसची प्रतिक्षा करीत होते. त्यावेळी एका वाहनाने आलेल्या दोन जणांनी महिलेला जबरदस्तीने ओढून पिंपळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत एका शेडमध्ये घेवून गेले. त्याठिकाणी पीडित आदिवासी महिलेवर दोघांनी सामुहिक अत्याचार केला. ही घटना माणूसकीला काळीमा फासणारी असून निंदणीय आहे.

यापुर्वी नंदुरबार व धुळे जिल्ह्यात घडलेल्या आदिवासी महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वेळोवेळी राज्य महिला आयोगाने कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. परंतु तरीही देखील ठोस कार्यवाही होत असल्याने आदिवासी महिला व मुली सुरक्षित नाहीत. नवापूर येथील महिलेवर पिंपळनेरात झालेल्या सामुहिक अत्याचाराची घटना निषेधार्थ आहे. आदिवासी महिलेवर सामुहिक अत्याचार करणार्‍या दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पोलीस व प्रशासनास कार्यवाही करण्याच्या सूचना कराव्यात, निवेदनातून केली आहे.