आदिवासी वाद्यांच्या निनादाने दुमदुमून गेले खान्देशातील रस्ते; घडले आदिवासी संस्कृतीचे दर्शन

जळगाव : खान्देशात ‘जागतिक आदिवासी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जळगाव, नंदुरबार आणि धुळे शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आदिवासी बांधव आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवत आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले.

आदिवासी तरुणींनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा अविष्कार सादर केला. तसेच पारंपरिक शस्त्र हाती घेऊन आदिवासी मिरवणूक नृत्य सादर केले. पारंपरिक वाद्य, त्यावर ठेका धरणारे पारंपरिक वेशभूषेतील तरुण मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. एकूणच आदिवासी वाद्यांच्या निनादाने जळगाव, नंदुरबार आणि धुळे शहरातील रस्ते दुमदुमून गेले.

जळगाव शहरात आदिवासी शासकीय वसतिगृह व आदिवासी एकता परिषद यांच्या वतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पारंपरिक वाद्य, त्यावर ठेका धरणारे पारंपरिक वेशभूषेतील तरुण मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदानापासून या रॅलीची सुरूवात करण्यात आली. यावेळी एकता आदिवासी परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच आदिवासी बांधव आणि विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला.

आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणा-या या मिरवणूकीमध्‍ये क्रांतिवीर बिरसा मुंडा, खाज्या नाईक, जयपाल मुंडा, वीर एकलव्य यांसह अनेक क्रांतिकारी व आदिवासी दैवतांचा गुणगौरव करण्यात आला.

शहादा ( नंदुरबार )  जागतिक आदिवासी गौरव दिवसानिमित्त सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाचे कला व विज्ञान महिला महाविद्यालयात स्नेह या भित्तीपत्रकाचे उद्घाटनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव वर्षा जाधव , उद्घाटक म्हणून सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. संजय जाधव, प्राचार्य डॉ. व्ही.एस. पाटील , भित्तीपत्रक समितीचे प्रमुख डॉ. प्रसन्ना डांगे, प्रा. दिलीप पाडवी, प्रा. एच. आर. कुलकर्णी , प्रा. डॉ. अनिल साळुंके , प्रा. डॉ. भारत चाळसेसह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते.