आधी भांडण नंतर थेट जमिनीवर आपटले, जळगाव जिल्हा पुन्हा खुनाने हादरला

जळगाव : दुचाकी दुरूस्तीच्या कारणावरून झालेल्या वादातून दुचाकीधारकाने गॅरेजधारकाला जमिनीवर आपटून खून केला. ही दुदैवी चाळीसगाव तालुक्यात शनिवारी सायंकाळी  घटना घडली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून मारेकऱ्याला अटक करण्यात आली आहे.  महेश संतोष बोरसे रा. बहाळ कसबे ता.चाळीसगाव असे मयत तरूणाचे नाव आहे.

संशयित आरोपी ज्ञानेश्वर निंबा मासरे (कोळी) रा.बहाळ कसबे ता.चाळीसगाव याने काही दिवसांपुर्वी त्याची दुचाकी मयत महेश संतोष याच्याकडे गॅरेजवर दुरूस्ती करण्यासाठी टाकलेली होती. दरम्यान, दुरूस्ती करूनही दुचाकीत पुन्हा बिघाड झाल्याने ज्ञानेश्वर मासरे हा त्यांची दुचाकी घेवून शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता महेशच्या गॅरेजवर आला.

त्यावेळी महेश हा दुसरी दुचाकी दुरूस्तीचे काम करत होता. त्यावर ज्ञानेश्वर याने महेशला शिवीगाळ करून दुचाकी आत्ताच दुरूस्ती करून दे असे सांगितले. त्यावर थोडावेळ थांब असे महेशने सांगितल्यावर याचा राग आल्याने ज्ञानेश्वर कोळी याने शिवीगाळ व दमदाटी केली.

हे भांडण सुरू असताना महेशचे वडील संतोष तुकाराम बोरसे यांनी भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील शिवीगाळ केली. त्यानंतर ज्ञानेश्वर कोळी याने महेशला धरून जमिनीवर आपटले, यात महेशचा जागीच मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर संशयित आरोपी ज्ञानेश्वर कोळी हा पसार झाला.

महेशचे वडील संतोष बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयित आरोपी ज्ञानेश्वर कोळी यास अटक करण्यात आली आहे.  पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड करीत आहे.