आनंदवार्ता ! सलग तिसऱ्या महिन्यात गॅस सिलिंडरचे दर घसरले, आजपासून नवे दर लागू

मुंबई । एकीकडे देशात लोकसभा निवडणुकीचा अंतीम टप्पा आज पार पडत असून या निवडणुकीचा निकाल चार जून रोजी येणार आहे. लोकसभा निवडणूक निकाल येण्यापूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. जून महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. सलग तिसऱ्या महिन्यात गॅसचे दर घसरले आहेत.

तेल विपणन कंपन्यांनी हा बदल 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरबाबत केला आहे. 1 जूनपासून दिल्लीत 69.50 रुपये, कोलकातामध्ये 72 रुपये, मुंबईमध्ये 69.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 70.50 रुपये सिलेंडर स्वस्त झाले आहे. दुसरीकडे घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

सलग तिसऱ्या महिन्यात कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमती कमी केल्या आहेत. यापूर्वी, एप्रिल आणि मेच्या सुरुवातीला किंमत कमी केली होती. IOCL च्या वेबसाइटवर नवीन सिलिंडरच्या किंमती अपडेट केल्या गेल्या आहेत

या कपातीनंतर आता दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडर आता 1745.50 रुपयांऐवजी आता 1676 रुपयांना मिळणार आहे. कोलकातामध्ये 19 किलोचा एलपीजी सिलिंडर 1859 रुपयांऐवजी 1787 रुपयांना मिळणार आहे. मुंबईत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1698.50 रुपयांना विकला जात होता, तो आता 1629 रुपयांवर आला आहे. तर चेन्नईमध्ये 1911 रुपयांना विकल्या जाणाऱ्या सिलेंडरची किंमत 1840.50 रुपयांवर आली आहे

घरगुती सिलेंडरचे दर असे
व्यावसायिक गॅस सिलिंडरचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. ते स्वस्त केल्यामुळे हॉटेल आणि बाहेरचे खाणे-पिणे स्वस्त होऊ शकते. परंतु घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत घरगुती सिलेंडरची किंमत 803 रुपये आणि उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी 603 रुपये आहे. कोलकात्यात 829 रुपये, मुंबईत 802.50 रुपये आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना घरगुती सिलिंडर मिळत आहे. यापूर्वी महिला दिनानिमित्त केंद्र सरकारने 14.2 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांपर्यंत कपात केली होती.