आनंदाची बातमी; केरळात मान्सूनची दमदार हजेरी

केरळ : आठवडाभर विलंबाने का होईना पण मान्सून अखेर केरळमध्ये पोहोचला आहे. नैऋत्य मोसमी पावसाने केरळमध्ये आज प्रवेश केला. हवामान विभागाने ही माहिती दिली आहे. मान्सून दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग आणि मध्य अरबी समुद्राचा काही भाग, लक्षद्वीप, केरळचा बहुतांश भाग आणि दक्षिण तामिळनाडू, कोमोरिन क्षेत्राचा उर्वरित भाग, मन्नारची खाडी, नैऋत्य, मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरात पुढे सरकला आहे. पुढील ४८ तासांत मान्सुनला पुढे सरकण्यासाठी अनुकुल स्थिती राहणार आहे. मात्र या मान्सूची वाट बिपरजॉय चक्रीवादळ रोखण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहिनुसार, ८ ते १० जून दरम्यान समुद्रात खूप उंच लाटा येण्याची शक्यता आहे. १२ जूनपर्यंत ही प्रणाली अत्यंत तीव्र चक्रीवादळाची ताकद कायम ठेवण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक परिणाम गुजरातच्या किनारपट्टीवरील शहरांमध्ये दिसून येईल. चक्रीवादळ कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारी भागातून पुढे सरकत आहे, पण, किनारपट्टी भागात काही जोरदार वारे वाहतील आणि काही भागात मुसळधार पाऊस पडेल.

हवामान खात्याने किनारपट्टीवरील शहरांमध्ये प्रशासनाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. यासोबतच समुद्रात उंच लाटा उसळण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. अरबी समुद्रातील वर्षातील पहिल्या प्री-मॉन्सून वादळाचे नाव ‘बिपरजॉय’ आहे. या वादळाचा मान्सूनवर परिणाम होत आहे. या वादळाचा परिणान मान्सूनच्या गतीवर झाला आहे.