तरुण भारत लाईव्ह । ६ सप्टेंबर २०२३। गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात पाठ फिरवलेल्या पावसाचे जिल्ह्यात पुन्हा आगमन होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित होत असून यामुळे जळगाव जिल्ह्यात बुधवार पासून ते १० सप्टेंबर पर्यंत दमदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यात जुलै महिना वगळता जून व ऑगस्ट हे दोन महिने कोरडेच गेले आहेत. तसेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देखील पाऊस झाला नाही. महिनाभरापासून पाऊस नसल्याने तापमानात देखील मोठी वाढ झाली. पारा ३५ अंशांवर पोचल्यामुळे जळगावकरांना ऐन श्रावणात घामाच्या धारा लागल्या होत्या. तर पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पीक देखील संकटात आली आहे. मात्र जिल्ह्यात ६ ते १० सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र विकसित झाले असून ६ सप्टेंबर नंतर हे क्षेत्र छत्तीसगड व विदर्भाकडे सरकणार आहे. त्यामुळे पुन्हा पावसाची स्थती निर्माण होणार असून यामुळे अनेक दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. ११ ते १३ सप्टेंबर पर्यंत पुन्हा काही तालुक्यांमध्ये किरकोळ पाऊस होऊ शकतो. मात्र १४ सप्टेंबर नंतर पुन्हा काही दिवस पावसाचा खंड पडू शकतो. त्यानंतर पुन्हा जर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले तर गणेशउत्सव काळात पुन्हा पाऊस होऊ शकतो