आनंदाची बातमी! भुसावळमार्गे ‘या’ शहरांदरम्यान दोन वंदे भारत ट्रेन्स धावणार

जळगाव । वंदे भारत ट्रेन ही वेगवान प्रवास आणि आरामदायी सुविधांमुळे प्रवाशांच्या पसंतीला उतरली असून या ट्रेनचा विस्तार वाढवला जात आहे. देशातील लोकप्रिय तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांना जोडणाऱ्या ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवण्याच्या योजनेवर काम करत आहे. याच दरम्यान, लवकरच मुंबई ते शेगाव आणि पुणे ते शेगाव मार्गावर दोन वंदे भारत ट्रेन्स सुरू होणार आहे. त्यासंदर्भातील अधिसूचनेचा प्रस्तावही मध्य रेल्वेकडून मागवण्यात आल्याची माहिती आहे.

देशातील महत्वाच्या स्टेशनपैकी भुसावळ स्टेशनचा देखील समावेश आहे. या स्टेशनपासून दररोज शेकडो रेल्वे गाड्या धावतात. मात्र, अद्यापही भुसावळ मार्गे वंदे भारत एक्स्प्रेस धावत नसून भुसावळकर या ट्रेनच्या प्रतीक्षेत आहे. मात्र आता त्यांची प्रतीक्षा संपुष्टात येऊ शकते. मुंबईसह पुणे स्थानकावरून शेगावसाठी वंदे भारत ट्रेन्स लवकरच धावू शकते.

विदर्भाची पंढरी म्हणून संत गजानन महाराज यांचे श्रीक्षेत्र शेगावची ओळख आहे. देशभरातून दररोज हजारो भाविक शेगावला जाऊन गजानन महाराजांच्या चरणांचं दर्शन घेतात. मात्र, प्रवासासाठी त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो. हीच बाब लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने शेगावसाठी दोन वंदे भारत टेन्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबईहून शेगाव आणि पुण्याहून शेगावसाठी वंदे भारत ट्रेन्स धावणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान, मध्य रेल्वेमार्गावर जळगाव व भुसावळ ही महत्त्वाची जंक्शन स्थानके आहेत. या स्थानकांवरुन शेगावी जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे ‘वंद भारत ट्रेन’ला या दोन्ही स्थानकांवर थांबा मिळण्याचीही शक्यता आहे.