आनंदाची बातमी! राज्यातील नागरिकांना मिळणार मोफत आरोग्य सुविधा

पुणे : राज्यातील शासकीय रुग्णालयात मोफत आरोग्यसेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून निर्णयाचा लाभ गरीब आणि गरजू रुग्णांना होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. महाराष्ट्र शासन, सोमेश्वर फाऊंडेशन आणि निरामय फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने महाआरोग्य शिबिराचे उद्घाटनावेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, कोविड काळात आरोग्यसेवेचे मह्त्त्व अधोरेखित झाले असून शासनानेदेखील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. तसेच, राज्याच्या आरोग्यसुविधेसाठी २१० कोटींची तरतूद केली असून ७०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आला असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २ हजार ४१८ संस्थांमध्ये नि:शुल्क उपचार होणार आहेत. राज्यात ॲडेनो व्हायरसमुळे डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरली असून पुण्यात साथीचे प्रमाण अधिक आहे. नागरिकांनी डोळ्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केले.

दरम्यान, स्व. आमदार विनायक निम्हण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या कार्यक्रमाला राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री सुरेश नवले, अर्जुन खोतकर, आमदार प्रसाद लाड, सिद्धार्थ शिरोळे, सनी निम्हण, आरोग्य संचालक डॉ.अजय चंदनवाले आणि राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित होते.