नवी दिल्ली : दिल्ली आणि पंजाबमधील सत्ताधारी पक्ष आम आदमी पार्टीने काँग्रेसला एक मोठी ऑफर दिली आहे. जर काँग्रेस पक्षाने दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक लढवली नाही तर आम्ही देखील राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत उतरणार नसल्याचे आम आदमी पक्षाने सांगितले आहे. ‘आप’ने दिलेल्या या ऑफरमुळे देशातील सर्वात जुन्या राजकीय पक्षाची कोंडी झाल्याचे दिसते.
आपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांनी काँग्रेसची कोंडी करताना म्हटले की, काँग्रेस पक्षाला दिल्लीत २०१५ आणि २०२० च्या विधानसभा निवडणुकांमध्ये एकही जागा मिळाली नव्हती. त्यामुळे जर काँग्रेसने दिल्ली आणि पंजाबमध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यास आम्ही देखील राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीतून माघार घेऊ.
तसेच काँग्रेस आम आदमी पार्टीच्या घोषणापत्राची चोरी करत असल्याचा आरोप देखील ‘आप’ने केला. काँग्रेस देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष आहे, पण ते आज सी-सी, कॉपी-कट-काँग्रेस झाली आहे. ते अरविंद केजरीवाल यांच्या भूमिका, अजेंडा याची चोरी करत आहेत. काँग्रेसने ‘आप’च्या मोफत वीज या योजनेची खिल्ली उडवली होती. पण हिमाचल प्रदेशमध्ये त्यांनी ३०० युनिट वीज मोफत देणार असल्याचा वादा केला. अशा शब्दांत सौरभ भारद्वाज यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.