आपच्या खासदाराने घेतील खलिस्तान समर्थकाची भेट; राघव चड्ढा वादाच्या भोवऱ्यात

 

raghav chadha british mp meeting

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे खासदार राघव चड्ढा हे अलीकडेच ब्रिटनमध्ये आयोजित जागतिक आरोग्य परिषदेला उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी प्रीत कौर गिल यांची भेट घेतली होती. या भेटीवरून राघव चढ्ढा हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. गिल या खलिस्तानसमर्थक मानल्या जातात. या भेटीवरून भाजपानेही चड्ढा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

लेबर पार्टीच्या खासदार प्रीत कौर गिल या खलिस्तानसमर्थक मानल्या जातात. गिल यांच्यावर भारत सरकारने अनेकदा टीकाही केली आहे. फेब्रुवारी महिन्यात ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये बोलताना त्यांनी भारतावर गंभीर आरोप केले होते. भारताशी संबंधित काही एजंट ब्रिटनमधील शीख नागरिकांना लक्ष्य करीत असल्याचे त्या म्हणाल्या होत्या. तसेच काही शीख नागरिक तर भारतीय एजंटांच्या हिट लिस्टवर होते, असा आरोपही त्यांनी केला होता.

दरम्यान, या भेटीवरून भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी आम आदमी पक्षावर जोरदार टीका केली आहे. “हे कसले सरकार आहे? राज्याचा (पंजाब) एक खासदार भारतविरोधी बोलणाऱ्या आणि दहशतवादाला समर्थन देणाऱ्यांबरोबर फोटो काढण्यासाठी उभा आहे”, असे ते म्हणाले. भाजपाच्या टीकेवर आम आदमी पक्षाने मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.