नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (28 मे) दिल्लीतील नवीन संसद भवनाचे उद्घाटन पार पडलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थितांना संबोधित केले. ही नवी वास्तू आपल्या स्वातंत्र्यसैनिकांची स्वप्ने साकार करण्याचे साधन बनेल. ही नवीन इमारत स्वावलंबी भारताचा सूर्योदय पाहणार आहे. या नवीन इमारतीमुळे विकसित भारताच्या संकल्पांची पूर्तता होणार आहे. नवे पॅटर्न नव्या वाटांवर चालल्यानेच निर्माण होतात. आज नवा भारत नवीन ध्येय निश्चित करत आहे. प्रत्येक देशाच्या विकासाच्या प्रवासात असे काही क्षण येतात जे अजरामर होतात. 28 मे हा असा दिवस आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करताना म्हटले.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने देश अमृत महोत्सव साजरा करत आहे. आज सकाळी संसद भवन संकुलात सर्वधर्मीय प्रार्थना आयोजित करण्यात आली. या सुवर्ण क्षणासाठी मी सर्व देशवासियांचे अभिनंदन करतो. ही केवळ एक इमारत नाही, तर ती 140 कोटी भारतीयांच्या आकांक्षांचे प्रतिबिंब आहे, नवीन संसद भवनात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
उद्घाटनप्रंसगी राष्ट्रपतींचा,उपराष्ट्रपतींचा संदेश
नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा आणि जयदिप धनखड यांचा संदेश राज्यसभेचे उपसभापती हरीवंश यांना वाचून दाखवला.
75 रुपयांच्या विशेष नाण्याचं अनावरण
नवीन संसद भवनाच्या उद्घाटन प्रसंगी 75 रुपयांच्या विशेष नाण्याचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण करण्यात आलं आहे.