आमदारांनी तोंडाला बांधल्या काळ्या पट्ट्या; वाचा काय घडले विधानभवनात

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर त्याचे पडसाद शुक्रवारीही विधानसभेत उमटले होते. आता आज पुन्हा एकदा विधानसभेचं कामकाज सुरू होण्यापूर्वी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस असून अधिवेशनाचे कामकाज सुरू होण्याअगोदर विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाच्या पायरवर बसून हातात ‘लोकशाहीची हत्या’ असे फलक घेऊन हे मूक आंदोलन करण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी तोंडावर काळया पट्टया बांधल्या होत्या.

लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर खासदार किंवा आमदाराला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाली तर त्याचे सदस्यत्व रद्द केले जाते. सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधींना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आणि त्यानंतर २४ तासांच्या आता लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली. राहुल गांधी यांना तातडीने जामीन मंजूर करण्यात आला आणि शिक्षेला ३० दिवसांची स्थगिती देण्यात आली तरीही ही कारवाई झाली. ही लोकशाहीची दडपशाही आहे असं मत सगळ्याच विरोधी पक्षांनी नोंदवलं. आज विधानसभेच्या बाहेर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काळ्या फिती लावून या निर्णयचा निषेध नोंदवला.