शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आमदार अपात्रतेचा निकाल वेळेआधीच लागण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी सुनावणी घेताना तसे संकेत दिले आहेत. मंगळवारपर्यंत (१२ डिसेंबर) शिंदे आणि ठाकरे गटाची उलट साक्ष तपासणी संपवा, असे निर्देश त्यांनी दोन्ही गटातील वकिलांना दिले आहेत
मागील काही दिवसांपासून आमदार अपात्रता प्रकरणाच्या कारवाईला वेग आला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ठाकरे आणि शिंदे गटाच्या आमदारांची उलट तपासणी करीत आहेत. ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे, योगेश कदम, उदय सामंत, दीपक केसरकर आणि खासदार राहुल शेवाळे यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. आज म्हणजेच मंगळवारी शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर, राहुल शेवाळे आणि शेवटी भरत गोगावले यांची उलट साक्ष होणार आहे.
दोन्ही गटातील आमदारांची उटल तपासणी झाल्यानंतर १३ ते १५ डिसेंबर दरम्यान लेखी युक्तिवाद होणार आहे. त्यानंतर १६ ते २० डिसेंबर दरम्यान या प्रकरणाची अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. २० किंवा २१ डिसेंबर रोजी यावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी जारी केलेल्या निर्देशावर ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांनी नाराजी व्यक्त केली. माझी ६ दिवस उलट तपासणी झाली. इथे ३ दिवसांतच ५ ते ६ लोकांची चौकशी संपवा, असे निर्देश मिळत असतील तर हे बरोबर नसल्याचे त्यांनी म्हटले. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ही सुनावणी वेळेत संपवा, अशी आमची मागणी असल्याचं ते म्हणाले.