आमदार अपात्रतेच्या निकालानंतर ठाकरे गटात जुंपली !

Maharashtra Politics : आमदार अपात्रता प्रकरणी आलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2018 ला पक्षाच्या घटनेतील बदलांची निवडणूक आयोगात नोंद का नाही यावरून पक्षात खडाजंगी झाल्याची माहिती समोर आली आहे. पक्षातील प्रमुख नेत्यांनी उद्धव ठाकरेंकडे याबद्दल प्रश्न उपस्थित केले.

उद्धव ठाकरे गटातील नेते अनिल देसाई आणि सुभाष देसाई यांच्यावर पक्षाच्या प्रशासकीय कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. घटनादुरुस्तीची नोंद निवडणूक आयोगात न केल्याचे खापर अनिल देसाई आणि सुभाष देसाईंवर फोडण्यात आलं आहे.

घटनेतील बदल, संघटनात्मक रचना, निवडणूक आयोगाशी पत्र व्यवहार यामध्ये त्रुटी आढळल्याने विधिमंडळ अध्यक्षांनी विरोधात निकाल दिल्याचं पक्षातील एका गटाचं मत आहे. याबाबत उद्धव ठाकरेंशी चर्चा करण्यासाठी संजय राऊत, अरविंद सावंत आणि सुभाष देसाई मातोश्रीवर दाखल झाले होते.

जर निवडणूक आयोगात घटनेतील बदलांसकट घटनेची प्रत सोपवण्यात आली असेल तर एंडोर्समेंट कॉपी घेऊन पत्रकार परिषद घ्यावी अशी उद्धव ठाकरेंडकडे मागणी करण्यात आली. पण पक्षाकडे एंडोर्समेंट कॉपी नसेल तर देसाईंना याबद्दल जाब विचारण्यात यावा अशी उद्धव ठाकरेंकडे मागणी करण्यात आली आहे.