आमदार आमश्या पाडवी यांनी त्वरित राजीनामा द्यावा, शिवसेना (उबाठा गट) पदाधिकाऱ्यांची मागणी

नंदुरबार : काल विधान परिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांनी ठाकरे गटाला रामराम करत शिंदे गटात प्रवेश केला. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटातील पदाधिकारी हे चांगलेच नाराज झाले असून त्यांच्यात असंतोष पसरला आहे. त्यामुळे त्यांनी आमदार आमश्या पाडवीचा जाहीर निषेध करून राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

नंदुरबार येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, युवा जिल्हाध्यक्ष यांच्या सह प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक अटल बिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आली. या बैठकीत एकमताने ठराव करून आमदार आमश्या पाडवी यांच्या निषेध करण्यात आला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून 2022 साली पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुवत नसतांना आंमश्या पाडवी यांना आमदार बनवले याचे कारण नंदुरबार जिल्हा दुर्लक्षित व दुर्गम भाग आहे याचा विकास व्हावा म्हणून यांना आमदार बनवले परंतु आमश्या पाडवीनी स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे . म्हणून जर यांच्यात जराही नैतिकता असेल तर त्यांनी त्वरित आमदार पदाचा राजीनामा द्यावा आणि मग शिवसेनेला आव्हान द्यावे असे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी आमदार आमश्या पाडवी याचा जाहीर निषेध केला आहे.

यावेळी सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, जिल्हा समन्वयक दीपक गवते, जिल्हा महानगर प्रमुख पंडित माळी, नवापूर येथील उपजिल्हाप्रमुख गोटू पाटील, युवती सेना राज्यसहसचिव मालती वळवी, महिला आघाडी जिल्हा संघटक रीना पाडवी, जिल्हा युवा सेना अधिकारी अर्जुन मराठे, माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील, शहर प्रमुख राजधर माळी, शहादा तालुकाप्रमुख राजु लोहार, शहर प्रमुख सागर चौधरी, तळोदा उपजिल्हाप्रमुख आनंद सोनार, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, जिल्ह्यातील पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.
यासंदर्भात बैठकीचे आवाहन जिल्हा महानगरप्रमुख पंडित माळी यांनी केले होते.