शिवराज्याभिषेक सोहळा : ३५०० मावळे उद्या निघणार रायगडच्या दिशेने, आमदार मंगेश चव्हाणांची संकल्पना

जळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याणकारी स्वराज्याची मुहूर्तमेढ ज्या राजधानीत रोवली व ते “छत्रपती” झाले तो सुवर्णदिन म्हणजे शिवराज्याभिषेक दिन.  चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या संकल्पनेतून गेल्या २ वर्षांत २ हजार ७०० हून अधिक तरुणांना रायगड मोहिमेच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे याची देही याची डोळा दर्शन घडवून आणण्यात आले आहे.  यावर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष होत असल्याचे औचित्य साधून चाळीसगाव तालुक्यातील ३५०० युवकांना किल्ले रायगडावर नेण्याचा संकल्प आमदार चव्हाण यांनी केला आहे. रविवार, ४ जून रोजी सायंकाळी ५ वाजता चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवरायांची महाआरती व रायगड मोहीम शुभारंभ सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

सदर मोहिमेची जय्यत तयारी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कार्यालयात सुरु असून दि.४ जून ते ७ जून २०२३ अश्या चार दिवसांची ही मोहीम असणार आहे. येऊन जाऊन जवळपास ९०० हून अधिक किलोमीटर अंतराची रायगड मोहीम असून अश्या प्रकारचा उपक्रम राबविणारे आमदार मंगेशदादा चव्हाण हे राज्यातील एकमेव लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्या या उपक्रमाची दखल राज्यभरासह मागील वर्षी प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक सोहळ्यात देखील घेतली गेली होती.

९०० किमी अंतराची रायगड वारीत शिवप्रेमींचा प्रवास सुखकर व्हावा व त्यांची जेवणाची – पाण्याची आबाळ होऊ नये यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी मोठी यंत्रणा कामाला लावली आहे. शिवप्रेमींच्या प्रवासासाठी ४५ राज्य परिवहन महामंडळाच्या ४५ नव्या कोऱ्या बसेस तसेच ५० खाजगी वाहने उपलब्ध करून दिली आहेत. या चार दिवसात १४ हजाराहून अधिक व्यक्तींचे जेवण आणि नाश्ता ठिकठिकाणी चाळीसगाव येथून सोबत असणाऱ्या आचारी यांच्याकडून बनवला जाणार आहे. तसेच प्रवासात ठिकठिकाणी आणि रायगड किल्य्यावर जाताना शिवप्रेमींसाठी १ लिटरच्या १५ हजार पाणी बाटल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच सहभागी सर्व शिवप्रेमींना प्रत्येकी १ असे आकर्षक टी शर्ट देखील दिले जाणार आहेत. सोबत आपत्कालीन परिस्थितीत मदत म्हणून दोन रुग्णवाहिका व औषधोपचार कीट देखील असणार आहे. यासाठी जवळपास १०० हून अधिक भाजपा कार्यकर्ते / स्वयंसेवकांची यंत्रणा गेल्या ,महिनाभरापासून कामाला लह्ली आहे. या सर्व प्रवासात आमदार मंगेश चव्हाण हे शिवप्रेमी यांच्या सोबतच राहणार असून त्यांनी लावलेली एकूणच व्यवस्था पाहता  शिवप्रेमींची कुटुंबातील सदस्यांप्रमाणेच ते काळजी घेत असल्याचे दिसते.

शिवरायांचे आदर्श विचार मतदारसंघातील  तरुण पिढीत रुजावेत यासाठीच हा अट्टाहास – आमदार मंगेश चव्हाण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर श्रध्दा असणारी स्वाभिमानी, नीतीवंत, निर्व्यसनी युवा पिढी घडविण्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी २०१९ मध्ये ४०० हुन तरुणांना रायगड वारी घडवून आणली होती. त्यावेळी पुढील काळात दरवर्षी किमान १००० तरुणांच्या कपाळी रायगडाची माती लावेल असा संकल्प केला होता. मध्यंतरी कोविड मुळे २ वर्ष यात खंड पडला. नंतर २०२२ मध्ये मागील वर्षी १५०० तरुणांना रायगड दर्शन घडविता आले. यावर्षी चाळीसगाव शहर व तालुक्यातील जवळपास ३५०० तरुण यात सहभागी करण्याचे नियोजन असल्याची प्रतिक्रिया आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिली. राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक शिवप्रेमी आमदार या नात्याने शिवरायांचे आदर्श विचार मतदारसंघातील तरुण पिढीत रुजावेत यासाठीच हा अट्टाहास असल्याचे देखील त्यांनी सांगितले.