कोल्हापूर : राज्यात छत्रपती संभाजी नगर, अहमदनगर, कोल्हापूर येथे औरंगजेबचे उदात्तीकरण केले जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यातून कोल्हापूर येथे जातीय तणाव निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर माजी कामगार मंत्री कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कागलमधील परिस्थितीवरून औरंगाजेबाचे उदात्तीकरण करणार्यांना कडक शब्दांमध्ये फटकारले आहे. औरंगजेब आपला कधीच होऊ शकत नाही, त्याचे उदात्तीकरण होऊच शकत नाही, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
हसन मुश्रीफ म्हणाले की, औरंगजेबचे उदात्तीकरण कधीच होऊ शकत नाही. मुस्लिम कुटुंबांनी आपल्या मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे. त्यांना इतिहास समजून सांगणं गरजेचं आहे. शिवरायांना मुसलमानांबद्दल कधीच आकस नव्हता. २२ वतनदार आणि सैन्याचे प्रमुख महाराजांसोबत मुस्लिम होते. तर मावळे मुस्लिम किती असतील. त्यामुळे औरंगजेब आपला शत्रूच आहे, त्याचे उदात्तीकरण होऊ शकत नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
कागलमध्ये काय घडलं?
कागलमध्ये एका तरुणाने टिपू सुलतानचे स्टेटस लावल्याचे व्हायरल झाल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांसह काही आक्रमक तरुणांनी कागल पोलीस ठाण्याकडे धाव घेत कारवाईची मागणी केली. जमावाला परत जाण्यास सांगताना संबंधित तरुणाविरोधात गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी दिली. यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गोसावी यांनी दोन्ही समाजातील लोकांसह व्यापार्यांना बोलावून बैठक घेत बंद न करण्याचे आवाहन केले. त्याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बंद न करण्याची ग्वाही या बैठकीत दिली.