आयफोनसाठी उपसले २१ लाख लिटर पाणी; शासकीय अधिकार्‍याचा प्रताप

नवी दिल्ली : एका अधिकार्‍याचा फोन पाण्यात पडल्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी तीन दिवस सलग २४ तास पंपाव्दारे पाण्याचा उपसा केल्याचा संतापजनक प्रकार छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात घडला आहे. सलग २४ तास ३० हॉर्स पॉवर मशीनच्या दोन डिझेल पंपांमुळे सुमारे २१ लाख लिटर पाणी वाया गेले. वाया गेलेल्या पाण्यामुळे दीड हजार एकर शेतजमीन जी सिंचनाखाली आली असती.

पखंजूरमध्ये तैनात असलेले अन्न निरीक्षक राजेश विश्वास रविवारी २१ मे रोजी मित्रांसोबत परळकोट जलाशयाच्या पार्टीला गेले होते. पार्टीदरम्यान त्यांचा मोबाईल जलाशयाच्या स्केल वाईजवळ पाण्यात पडला. हा आयफोन असल्याचे सांगितले जात आहे. पाण्यात पडलेला मोबाईल शोधण्यासाठी अन्न निरीक्षकांनी सोमवारी सकाळपासून ’शोध मोहिम सुरू केली.

अधिकार्‍याने आधी जवळच्या गावकर्‍यांना मोबाईल शोधण्यात गुंतवले. चांगले पोहणारे उतरले. त्यानंतर फोन काढण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर ३० एचपी क्षमतेचा पंप बसवून जलाशयातील पाणी बाहेर काढण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून पाणी काढण्यासाठी पंप सुरू होता.