आरक्षणाचा मुद्दा तापला; 12 बस फोडल्या, तहसीलदाराची गाडी पेटवली

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असून, आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे.

गावागावात आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. तर काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचा देखील पाहायला मिळत आहे.

मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात 12 बस फोडण्यात आल्या आहेत. तर जालन्यात महिला तहसीलदाराची गाडी फोडण्यात आली आहे. तर, दुसरीकडे बीडच्या आष्टीत तहसीलदाराची गाडी अज्ञात लोकांनी पेटवून दिली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यात देखील मराठा समाज आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, धाराशिव जिल्ह्यात 6 बसची दगडफेक करण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे.

धाराशिव ते लातूर या बसवर रविवारी दुपारी दगडफेक करण्यात आली. तसेच, धाराशिव ते औसा या बसवर सांजा गावाजवळल,भूम आगारातील वालवड या बसवर वालवड गावातच, धाराशिव तालुक्यातील कोल्हेवाडी येथे निलंगा – पुणे, तर येडशी येथे धाराशिव -कळंब या बसवर दगडफेक करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्ह्यातील 144 एसटी बसच्या फेऱ्या रद्द करण्यात आले आहे.