नंदुरबार : जिल्ह्यात आणखी एका गर्भवती मातेला आपला जीव गमवावा लागला आहे. पिंपळखुटा (ता. अक्कलकुवा ) येथील कविता राऊत या महिलेची नादुरुस्त रुग्णवाहिकेत प्रसूती झाली. मात्र, पुढील काही उणींवामुळे तिला गमवावा लागला आहे. बाळाला आयुष्य देवून जगाच्या निरोप घेणारी कविता ही शासनाच्या अनास्थेची शिकार झाली आहे. दरम्यान, आरोग्य यंत्रणेच्या बोजवाऱ्यामुळे मृत मातांची संख्या ३२ वर पोहचली असल्याने आतातरी आरोग्य यंत्रणेला जाग येणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा येथील राऊतपाडा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. शासनाच्या कागदावरिल याच विकासाच्या परिभाषेमुळे अतिदुर्गम भागात अनेकाना आपले प्राण गमावावे लागले आहेत. याच शासनकी अनास्थेचा कविता मगन राऊत या बळी ठरल्या आहेत. कविताला प्रसुतीच्या कळा सुरू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जवळच्या पिपंळखुटा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र याठिकाणी वैद्यकीय अधिकारी नसल्याने उपलब्ध नर्सने तपासणी करुन मोलगी ग्रामीण रुग्णालयात रेफर केले. यासाठी तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध असलेली रुग्णवाहीका देण्यात आली.
मात्र, रुग्णवाहीका रस्त्यात एका चढावावर बंद पडली. परिणामी कविताची रस्त्यामध्येच नादुरुस्त रुग्णवाहीकेत प्रसुती झाली. प्रसुती दरम्यान काही गुंतागुतींमुळे बाळाला जन्म दिलानंतर तिची प्रकृती खालावली. याठिकाणी अर्धातासानंतर यंत्रणेकडून मोलगी ग्रामीण रुग्णालयाची गाडी दाखल झाली. मात्र उपचारासाठी पुढे तिला ग्रमाणी रुग्णालय मोलगी इथे नेल्यावर तिची प्रकृती पाहता तिला जिल्हा सामान्य रुग्णालयता हलविण्याचे सांगण्यात आले. मात्र जिल्हा सामान्य रुग्णालय गाठण्याआधीच कविताने आपले प्राण सोडले. कविताच्या घरापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यत खराब रस्ते. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी यांची अनुपस्थीती. त्यानंतर नादुरुस्त रुग्णवाहिका हे सारे कविताच्या प्राणासाठीच कारणीभुत ठरले.
कविता ही प्रसुती दरम्यानच्या मृत्युचे आज जरी प्रातिनिधी उदाहरण असली, तरी गेल्या वर्षात ४७ तर चालु वर्षात आतापर्यत ३२ माता मृत्यु झाले आहे. हे आकडे गंभीर असून यासाठी आरोग्य यंत्रणा कसोशीने प्रयत्न करत आहे. मात्र अपुरे आरोग्य अधिकारी, कर्मचारी आणि त्यातच तोकडी आरोग्य यंत्रणेच्या सहाय्याने आरोग्याच्या या समस्येवर त्यांच्याकडून फुंकर मारण्याची आशा बैमानीच म्हणावी लागेल. ह्या साऱ्या प्रकाराबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणा सखोल तपास करत असून जर कोणी दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाईची भाषा देखील करत आहे.