आरोपींनी बचावासाठी कायदेशीर मदत घ्यावी; जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कारागृहात आवाहन

नंदुरबार : बंदीगृहातील आरोपींनी खचून न जाता आपल्याकडून जाणता अजाणता झालेल्या चुकांवर व त्याबाबत आत्मचिंतन करुन समाजात प्रतीष्ठा निर्माण होईल असे प्रतिबिंब निर्माण करावे, असे प्रतिपादन अॅङ बी. एस. बिरारे यांनी केले.

नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती कारागृह वर्ग-1 येथे कायदेविषयक साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी बिरारे बोलत होते. अध्यक्षस्थानी लोक अभिरक्षक कार्यालयाचे उपमुख्य लोक अभिरक्षक अॅड बी. एस. बिरारे तर प्रमुख वक्ते म्हणून अॅङ डी. एन. कदमबांडे तसेच अॅङ एच. यु. महाजन व अॅङ शुभांगी आर. चौधरी, जिल्हा कारागृहाचे अधिक्षक देशमुख, वरिष्ठ तुरुंगाधिकारी संदानशीव हे उपस्थित होते.

बिरारे  पुढे म्हणाले की, गुन्हा सिध्द होईपावेतो आरोपी हा दोषपूर्ण ग्राहय धरला जात नाही. व्यक्तीकडून चुका होत असतात ज्यावेळी झालेली चूक ही कायद्याचा विरुध्द असते त्यावेळी आपल्याला कारागृहात जाण्याची वेळ येते. त्यामुळे आपल्या गैरकायदेशीर चुकांचे आत्मपरीक्षण करुन त्याबाबत विचारमंथन होवुन येथून बाहेर जावून समाजात प्रतीष्ठा निर्माण होईल असे कार्य आपल्या हातून घडावेत तसेच गरजेचा वेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गरजु आरोपींना न्यायीक मदतीसाठी सदैव तत्पर आहे त्यासाठी आरोपींनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नंदुरबार येथे संपर्क साधण्याचे आवाहन केले.

प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून अॅङ डी. एन. कदमबांडे हे मार्गदर्शन करतांना म्हणाले की, बंदी आरोपींनी मनात कोणतीही हीन भावना न ठेवता आपल्याकडून घडलेल्या कृत्याची पुनरावृत्ती होणार नाही. कायद्याचा चाकोरीत राहुन समाजहितासाठी आपल्या हातून चांगले कार्य होईल हयाची जाण ठेवावी. तसेच कारागृहातून चांगली शिकवण घेवुन समाजात एक प्रगतीशील कार्य आपल्या हातून घडेल हाच ध्यास घेवुन बाहेर यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी अॅड एच. यु. महाजन हयांनी शिबीरात बंदीना मोफत विधी सेवा कशा प्रकारे मिळू शकते हयाबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अॅङ शुभांगी आर. चौधरी यांनी केले.