तरुण भारत लाईव्ह | एरंडोल : एरंडोल पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर एरंडोल-कासोदा रस्त्यावर मोठी दुर्घटना घडली आहे. जळगाव येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या वाहनावर झाड पडून दोन ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना आज रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली.
कासोद्याकडून जळगावकडे जाणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या गाडीवर अचानक झाड पडल्याने गाडीतील पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर (वय ३६) व चालक अजय महाजन (वय ३५) दोघी राहणार जळगाव हे जागीच ठार झाले तर भरत नारायण जठरे (वय ३८), निलेश प्रकाश सूर्यवंशी (वय ३७), चंद्रकांत सिताराम शिंदे (वय ५८) हे जखमी झाले. ही घटना एरंडोल कासोदा रस्त्यावर एरंडोल पासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर अंजनी धरण परिसरात ही घडली.
या अपघाताची रात्री उशिरापर्यंत नोंद करण्याचे काम सुरू होते. दरम्यान पोलीस अधीक्षक एम. राजकुमार व पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील नंदनवारकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच एरंडोल ग्रामीण रुग्णालयात देखील भेट दिली.
या घटनेचे वृत्त समजतात एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश बोराडे, अनिल पाटील, प्रशांत पाटील, संदीप पाटील हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढले. यावेळी माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन, शैलेश चौधरी, विकी खोकरे, सिद्धार्थ परदेशी, अमरीश परदेशी आदी नागरिकांनी मदत केली.
आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेची एमएच १९ एम ०७५१ या क्रमांकाची गाडी कासोद्याहून एरंडोल मार्गे जळगावला जात असताना हा अपघात झाला. यावेळी अंजनी धरणानजीक चिंचेचे झाड अचानक या गाडीवर कोसळले नेमके काय घडले हे कळण्याच्या आत गाडीचा अपघात होऊन पोलीस अधिकारी दातीर व गाडी चालक अजय महाजन हे जागीच ठार झाले तर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले.