आर्वीसह परिसरातील शेतकऱ्यांनाही मिळणार जामफळचे पाणी

धुळे : आर्वी गावातील विकासकामांसह परिसरातील रस्त्यांसाठी आपल्या खासदारकीच्या गेल्या १० वर्षांच्या कार्यकाळात तब्बल ३४ कोटींचा निधी देऊन विकासाला बळ दिले. सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेद्वारे लाभक्षेत्रातील आर्वीसह परिसरातील गावांतील शेतकऱ्यांच्या शेतांतही वर्षभरानंतर तापीमाईचे पाणी पोहोचेल. यात पुरमेपाडा येथील धरणात पाणी टाकून आर्वीसह परिसर सुजलाम-सुफलाम होईल, अशी ग्वाही खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज दिली.

आर्वी (ता. धुळे) येथे आज ग्रामस्थांना केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासह या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रेचा उपक्रम झाला, त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी खासदार डॉ. भामरे बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा धरतीताई देवरे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रा. अरविंद जाधव, जिल्हा परिषदेच्या सदस्या शोभाताई हालोर, सरपंच नागेश देवरे, भाजपचे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, किशोर हालोर, जिभाऊ शेणगे, पंचायत समितीच्या सदस्या मीनाबाई देसले, लताबाई शेणगे, विश्वनाथ सोनवणे, नाना खैरनार, यात्रेचे जिल्हा संयोजक हरीश शेलार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खासदार डॉ. भामरे, जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे यांच्या हस्ते महिला, पुरुष, ज्येष्ठ नागरिक असलेल्या लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

विकसित भारताचे स्वप्न साकारूया

खासदार डॉ. भामरे म्हणाले, की २०४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न पाहिले आहे. याच संकल्पपूर्तीसाठी विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनातर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध ७२ योजनांचा लाभ गावागावांतील वंचित घटकांना दिला जात आहे. यानिमित्ताने आपणही भारताला विकसित बनविण्याचा संकल्प आज करूया.

आर्वी परिसरासाठी ३४ कोटींचा निधी

खासदार डॉ. भामरे म्हणाले, की तुमच्या आशीर्वादाने मिळालेल्या खासदारकीच्या १० वर्षांच्या कार्यकाळात आर्वी गावासाठी तसेच परिसरातील रस्त्यांसाठी ३४ कोटींचा निधी दिला. यात सीएसआर हॉलसाठी १० लाख, जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी ६० लाख, तसेच अन्य एका पाणी योजनेसाठी दोन कोटी ४५ लाख, गावांतर्गत रस्ते काँक्रिटीकरणासाठी १० लाख, हायमास्टसाठी दोन लाख, आर्वी-नंदाणे रस्त्यासाठी ८ कोटी चार लाख, आर्वी-सोनेवाडी रस्ता दुरुस्तीसाठी २ कोटी ४० लाख, आर्वी-शिरूड रस्त्यासाठी सीआरएफ फंडातून २० कोटींचा निधी दिला आहे.

धुळे-मनमाड मार्गावरील पहिले स्टेशन आर्वी

धुळे-मनमाड-इंदूर रेल्वेमार्गांतर्गत धुळे ते नरडाणा या पहिल्या टप्प्यातील रेल्वे रूळ टाकण्याचे काम लवकरच सुरू होत आहे. यानंतर धुळे ते मनमाड या दुसऱ्या टप्प्यांतर्गत भूसंपादनाचे काम सुरू होईल. त्यानंतर धुळे-मनमाडदरम्यान रेल्वे रूळ टाकण्यात येतील. या मार्गावरील धुळ्यानंतरचे आर्वी हे पहिले रेल्वेस्थानक होणार असून, ते भारताच्या रेल्वे नकाशावर ठळकपणे दिसून येईल, अशी माहिती खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी आज दिली.