नवी दिल्ली :अंतिम निकाल लागेपर्यंत, अंतिम विजय घोषित होईपर्यंत नवा भारत आपले प्रयत्न सोडत नाही. हा नवा भारत आपले सर्वोत्तम देण्याचा आणि सर्वोत्तम करण्याचाच प्रयत्न करतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांशी बोलताना केले.
भारताने २८ सुवर्ण पदकांसह विक्रमी १०७ पदके जिंकली आणि हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत चौथे स्थान पटकावले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. या प्रसंगी पंतप्रधानांनी खेळाडूंच्या असामान्य कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.
पंतप्रधानांनी मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळाडूंशी संवाद साधला ते म्हणाले, अंतिम निकाल लागेपर्यंत, अंतिम विजय घोषित होईपर्यंत नवीन भारत आपले प्रयत्न सोडत नाही. नवीन भारत आपले सर्वोत्तम देण्याचा, सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करतो. भारतीय खेळाडूंना जगातील सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात असा आमचा प्रयत्न आहे. भारतीय खेळाडूंना देश-विदेशात खेळण्याच्या जास्तीत जास्त संधी मिळाव्यात असा सरकारचा प्रयत्न आहे. खेड्यापाड्यात राहणाऱ्या क्रीडागुणांनाही जास्तीत जास्त संधी मिळाव्यात, यासाठीदेखील केंद्र सरकार सज्ज असल्याचे ते म्हणाले.
गेल्या ९ वर्षात क्रीडा अर्थसंकल्पातही पूर्वीच्या तुलनेत तीन पट वाढ करण्यात आली असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की ‘खेलो इंडिया’ हा योजगान गेमचेंजर ठरली आहे. भारताच्या सर्व खेळाडूंचे मनोधैर्य अबाधित राहावे आणि त्यांना कोणतीही कमतरता भासू नये यासाठी सरकार सदैव सज्ज आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या सर्व खेळाडूंच्या कामगिरीचा संपूर्ण देशाला अभिमान वाटत असून देशाच्या कानाकोपऱ्यात जल्लोषाचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये भारताच्या नारीशक्तीनेही मोठा पराक्रम गाजवला आहे, असेही पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले आहे.