मुंबई : मी तर तुमच्या पराभवासाठी सोनेरी आवरणाचे पेढे आणि ढोल ताशांची ऑर्डर देऊनच बसलो आहे, असा घणाघात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. तीन राज्यांतील भाजपच्या विजयानंतर आता त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेऊन दाखवा, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले होते. यावर आशिष शेलारांनी प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपाचे कार्यकर्ते तुम्हाला हरवण्यासाठी पूर्ण ताकदीने सज्ज आहेत.
लक्षात ठेवा विजय नेहमी ध्येयवेड्यांचाच होतो!@ShivSenaUBT_ @OfficeofUT @AUThackeray @rautsanjay61 @BJP4Mumbai #Mumbai #ShivsenaUBT #BJP pic.twitter.com/MKHrrIFVTs
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 5, 2023
आशिष शेलार म्हणाले की, “उद्धवजी तुमचं आव्हान आम्ही स्विकारलं आहे. मुंबईच्या निवडणुका तातडीने होऊ द्या पण एक अट आहे. तुमचे बगलबच्चे राजू पेडणेकर आणि समीर देसाई यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेली मुंबई निवडणुकांबाबतची याचिका मागे घ्यायला सांगा. तसेच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी असलेल्या ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या जागा नको हे एकदा घोषित करा. ओबीसी समाजाला असलेला तुमचा विरोध एकदा स्पष्ट होऊ द्या,” असे आव्हानही त्यांनी ठाकरेंना केले आहे.
पुढे ते म्हणाले की, “कुणाच्यातरी आड लपून निवडणुकीचं आवाहन करु नका. थेट मर्दासारखे निवडणुकीला या भाजप तुमचा पराभव करायला तयारच आहे. मीसुद्धा व्यक्तीश: तुमच्या पराभवासाठी आणि भाजपच्या विजयासाठी सोनेरी आवरणाचे पेढे आणि ढोल ताशांची ऑर्डर देऊनच बसलो आहे,” असेही ते म्हणाले.